पुणे : यंदा मान्सून जोरदार बरसल्याने थंडीचे आगमन लवकर होत आहे. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी राहील. तसेच मान्सून १५ ते २० सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून परतीला निघण्याची शक्यता आहे. मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते मान्सूनचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत लांबणार असून तो १५ ऑक्टोबरदरम्यान परतीला निघेल. दरम्यान, यंदा थंडीचे आगमन लवकर होईल आणि ती उशिरा निरोप घेईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण मांडले आहे की, यंदा मान्सून वेळेपेक्षा किंचित आधीच परतीला निघणार आहे. नेहमी तो २० ते २५ सप्टेंबरला पूर्व राजस्थानातून निघतो. मात्र, यंदा तो १५ ते २० सप्टेंबरदरम्यान निघेल. तसेच थंडीचे आगमन लगेच होऊन धुकेही लवकर पडेल. मात्र, हवामान विभागातील शास्त्रज्ञांच्या मते मान्सून सप्टेंबर अखेरपर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊन महाराष्ट्रातून पुढे जाण्यास १५ ऑक्टोबर उजाडेल.
‘ला-निना’ची ९० दिवसांची सायकल आणि थंडी
दिल्ली विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. ए. के. सिंग यांच्या मते, एल निनो नंतर ला-निना आपली सक्रियता दाखवण्यास ९० दिवसांचा कालावधी घेते. हा कालावधी ऑगस्टमध्येच पूर्ण झाला आहे. त्यामुळे मान्सून त्यानंतर दोन आठवड्यांत माघारी परतण्यास सुरुवात करेल. ज्या पद्धतीने गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या पावसाचा जोर कमी झाला आहे, यात उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे थंडी लवकर पडून ती जास्त लांबणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत कडाका जाणवेल.
मान्सून ऑक्टोबरपर्यंत लांबणार
ऊर्जा व पर्यावरण परिषदेचे प्रमुख विश्वास चितळे यांच्या मते, यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहील. कारण सिंधू आणि गंगेच्या मैदानी भागात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड भागात या वाढलेल्या पावसामुळे धोका निर्माण रब्बी संपून खरिपाच्या तयारीला शेतकरी लागतो. मात्र, पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पिकांची कापणी करण्यास विलंब झालेला आहे. तांदूळ, मका, डाळींना या वाढलेल्या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे.
मान्सूनचा पॅटर्न बदलतोय
तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे अनियमित पाऊस पडतोय. यंदा पर्जन्यछायेच्या भागातही चांगला पाऊस झाला आहे. अनेक भागांत अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. अल-निनो आणि ला निनाची अस्थिरता याला कारणीभूत आहे. अल-निनोमुळे जूनच्या सुरुवातीला कमी पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत दुष्काळी स्थिती होती. मात्र, ला-निना स्थिती सुरू होताच पाऊस खूप झाला.
काही शास्त्रज्ञ म्हणतात, मान्सूनचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत
दुसरा गट म्हणतो ,२० सप्टेंबरला मान्सून १५ निरोप घेणार आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातून मोठा पाऊस कमी झालेला असला तरी हलका ते मध्यम पाऊस काही भागांत सुरू आहे. आगामी चार दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्र अन् कोकणातील काही भागांत पाऊस सुरूच आहे. मराठवाड्यात पाऊस थांबला होता. सोमवारपासून त्या भागातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू होत आहे. १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ७० टक्के जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.