Ad imageAd image

बेळगावच्या उद्योजक भांडवल धारकांना रवांडाचे आमंत्रण

ratnakar
बेळगावच्या उद्योजक भांडवल धारकांना रवांडाचे आमंत्रण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : रवांडा देशात कृषी, आरोग्य, शिक्षण, खाणकाम, ऊर्जा, पायाभूत सुविधा यासह विविध क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत. उद्योजक आणि भांडवली गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांचे स्वागत करतोय, अशी माहीती पूर्व आफ्रिकेतील रवांडाच्या उच्चायुक्त जॅकलीन मुकांगिरा यांनी दिली.
बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये रविवारी आयोजित स्थानिक व्यापारी आणि भांडवली गुंतवणूकदारांच्या बैठकीत ते बोलत होते. रवांडा ई-कॉमर्स, ई-सेवांसह विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. देशात भ्रष्टाचाराला जागा नाही; देशात व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. भांडवली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी कर व्यवस्था अस्तित्वात आहे. पारदर्शक आणि नोकरीसाठी अनुकूल वातावरण असलेला हा आफ्रिकेतील सर्वात सुरक्षित देश आहे. आफ्रिकेत गेल्या अकरा वर्षांपासून रवांडा आर्थिक विकासात आघाडीवर आहे, असे मुकांगिरा यांनी सांगितले.
रवांडामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त सहा तास लागतात. जॅकलिन मुकांगिरा म्हणाल्या, वन स्टॉप सेंटरच्या मॉडेलमध्ये शासन दोनशे प्रकारच्या शासकीय परवानग्या मोफत देणार आहे. आफ्रिकेत गुंतवणूक करू इच्छिणार्‍या व्यावसायिकांचे पहिले प्राधान्य रवांडाला असायला हवे. इंटरनेट सुविधा, वीज कनेक्शन, शुद्ध पिण्याचे पाणी यासह पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. देशाच्या संविधानाने महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्राधान्य दिले असल्याने 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिला खासदार आहेत. पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, कृषी, ऊर्जा पर्यटन, आरोग्य, खाणकाम, शिक्षण आणि इतर क्षेत्रात गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत, असे सांगितले.

भारतातील उद्योजकांना व्यवसाय, कृषी, शिक्षण, सुरक्षा, ऊर्जा आणि संशोधन क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोफत संधी देत आहे. पूर्व आफ्रिकन देशांपैकी रवांडा हा व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील उद्योजकांनी याचा लाभ घेऊन भारत आणि रवांडा यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी, रवांडामध्ये भारतीय क्रीडा शाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी आवश्यक जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्या देशात उद्योग उभारण्याच्या अनेक संधी आहेत. बेळगाव जिल्ह्यातील व्यावसायिकांनी यात रस दाखवावा, अशी सूचना त्यांनी केली.
भारत आणि रवांडा यांच्यातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केली. प्रारंभी जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट यांनी बेळगाव जिल्ह्याने उद्योग, शिक्षण, आरोग्य, ऑटोमोबाईल, साखर उद्योग यासह विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार राजू सेट, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील उद्योजक सहभागी झाले होते.
सुवर्णसौधला दिली भेट
रवांडाच्या उच्चायुक्त जॅकलीन मुकांगिरा रविवारी सकाळी हलगा येथील सुवर्णसौधला भेट देत पाहणी केली. यावेळी पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी मुकांगिरा यांना बेळगाव सुवर्ण सौध मध्ये चालणाऱ्या कामकाजाविषयी अधिवेशनाविषयी माहिती दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article