Ad imageAd image

पतंजलीच्या ‘शाकाहारी’ उत्पादनात माशांचा अर्क? रामदेव बाबा यांना न्यायालयाची नोटीस

ratnakar
पतंजलीच्या ‘शाकाहारी’ उत्पादनात माशांचा अर्क? रामदेव बाबा यांना न्यायालयाची नोटीस
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baba Ramdev Patanjali Product: दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागल्यानंतर आता पुन्हा एकदा बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंतजलीच्या एका उत्पादनाची दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. पतंजलीच्या ‘दिव्य मंजन’ या उत्पादनाच्या पाकिटावर हिरव्या रंगाचे वर्तुळाकार चिन्ह दाखवले आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो की, हे शाकाहारी उत्पादन आहे. मात्र प्रत्यक्षात या मंजनमध्ये माशांचा अर्क वापरला जात आहे, असा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने तक्रारीत म्हटले की, सदर उत्पादन शाकाहारी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे मंजन वापरत आहोत. वनस्पती आधारित शाकाहारी मंजन असल्याचा आपला समज होता. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनातून पुढे आले की, यामध्ये माशांचा अर्क असलेले समुद्रफेन वापरले जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला.

ही याचिका यतिन शर्मा नामक वकिलांनी दाखल केली आहे. दिव्य मंजन उत्पादनाच्या पाकिटावर शाकाहारी उत्पादन असल्याचे हिरव्या रंगाचे चिन्ह दाखविले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात मंजनमध्ये समुद्री माशांचा अर्क वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. ही ग्राहकांची दिशाभूल तर आहेच, त्याशिवाय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचेही उल्लंघन आहे. ही नवी माहिती समोर आल्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला. तसेच आमच्या धार्मिक आस्था आम्हाला मांसाहारी उत्पादने वापरण्याची परवानगी देत नाहीत, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
तसेच दिव्य मंजनमध्ये समुद्रफेन वापरले जात आहे, हे योगगुरु बाबा रामदेव यांनी एका युट्यूब व्हिडीओमध्येही मान्य केले आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि आयुष मंत्रालयासह विविध सरकारी विभागांकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशीही खंत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
याचिका स्वीकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद, बाबा रामदेव, केंद्र सरकार आणि दिव्य मंजन उत्पादित करणाऱ्या पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोटीस बजावली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दिव्य मंजनवर याआधीही आक्षेप
दिव्य मंजन या उत्पादनावर याआधीही आक्षेप घेण्यात आला होता. पतंजलीच्या उत्पादनात माश्यांचा अर्क वापरल्याचा आरोप करत वकील शाशा जैन यांनी नोटीस पाठविली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article