पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान आता पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्गयेथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही ज्या वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. आमचे संस्कार वेगळे आहेत. त्या लोकांसारखे नाही, जे महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे. मात्र, त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही, विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. हे आमचे संस्कार आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.