Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १६ व्या पर्वात एका स्पर्धकाने चक्क अमिताभ बच्चन यांच्याकडे केलेल्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलीवूडचे महानायक म्हणून ज्यांची सर्वदूर ओळख आहे, ते अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन होय. अमिताभ बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करीत आहेत. आता या शोमध्ये एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे केलेल्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वातील हा आठवडा इंडिया चॅलेंजर वीक होता. ‘जल्दी ५’ या नवीन सेगमेंटचा या खेळात समावेश केला गेला आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट यामध्ये जे दोन विजेते असतील, त्यांना हॉट सीटपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करावी लागणार आणि त्या दोघांपैकी जी व्यक्ती जिंकेल, तिला ‘कौन बनेगा करोडपती’चा खेळ खेळण्याची संधी मिळणार आहे.
‘फास्टेट फिंगर फर्स्ट’मध्ये अलका सिंग व हर्षित भुटानी हे विजेते झाले, त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’चा खेळ खेळण्यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करावी लागली. त्यामध्ये अलका सिंग यांनी ही फेरी जिंकत त्या हॉट सीटपर्यंत पोहोचल्या.
ज्यावेळी अलका सिंग ही फेरी जिंकत हॉट सीटपर्यंत पोहोचल्या, त्यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी त्यांना अश्रू पुसण्यसाठी टिश्यू पेपर दिले. त्यावेळी त्यांनी सांगितले, “अनेक स्पर्धक जेव्हा हॉट सीटपर्यंत येतात, त्यावेळी ते भावूक होतात.” त्यावर अलका यांनी मी जास्त रडले नाही, असे म्हटले. त्यावर अमिताभ बच्चन यांनी लगेच माफी मागत म्हटले, “बघितलं की, मी किती पटकन सॉरी म्हणालो.” बिग बींनी असे म्हणताच, अलका यांनी त्यांना ‘गुड बॉय’ म्हटले. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना सांगितले की, मी ८२ वर्षांचा असून तिने मला “शहाणा मुलगा”, असे म्हटले.
“बिग बीच्या दाढीला हात लावायचाय…”
या शोमध्ये अलका यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी काही मागणी केली आहे, जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अलका म्हणाल्या, “तुम्हाला हे विचित्र वाटू शकतं; पण मला तुमच्या दाढीला हात लावायचा आहे.” त्यावर अमिताभ बच्चन यांनी विचारले की, माझ्या दाढीला हात लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भावाच्या किंवा वडिलांच्या दाढीला का हात नाही लावत? त्यावर माझ्या वडील आणि भावाला क्लीन शेव्ह ठेवायला आवडत असल्याने मला तसे करता येत नाही, असे उत्तर अलका यांनी दिले. त्यावर गमतीने अमिताभ बच्चन यांनी म्हटले, “ज्यावेळी तुमचा भाऊ ८२ वर्षांचा होईल, त्यावेळी त्याची दाढीदेखील पांढरी होईल. त्यावेळी त्याच्या दाढीला तू हात लाव.” पुढे ते म्हणाले, “ज्यावेळी एपिसोड संपत येईल, त्यावेळी तुम्ही दाढीला हात लावू शकता.” त्यावर अलका यांनी ते कारणे सांगत असल्याचे म्हटले.
अलका सिंग (वय २४) या इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर या पदावर कार्यरत असल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली.