बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे आयोजित गॅझेटेड प्रोबेशनरी ग्रुप ए आणि बी पदांसाठीची प्राथमिक स्पर्धा परीक्षा सुरळीत पार पडली असून या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली नाही, केवळ एका परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका पुरविण्यात थोडा विलंब झाला उर्वरित सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली अशी माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दिली.
आज जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर केपीएस सी परीक्षा पार पडल्या. या परीक्षेदरम्यान बेळगावमधील अंजुमन पदवी महाविद्यलयात प्रश्नपत्रिका पुरविण्यात थोडा विलंब झाला. यादरम्यान काही परीक्षार्थींनी याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
यादरम्यान परीक्षा केंद्रावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. मात्र हा प्रकार समजताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन गोंधळ मिटविला.
प्रश्नपत्रिका देण्यास विलंब झाल्याने पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ दिला जाईल, परीक्षा काळात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.