बेळगाव : पावसामुळे ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्यासाठी 1.2 लाख नुकसानभरपाई यासह घर देखील दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. आज पूरग्रस्त बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
राज्य सरकार नुकसान भरपाईच्या वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप होत असल्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, यापूर्वी बीएस येडियुरप्पा यांनी संपूर्ण घराच्या नुकसानीसाठी 5 लाख रुपये दिले होते. या मदतीचा दुरुपयोग झाला. अनेकांसाठी फक्त पहिला हप्ता जारी झाला आहे आणि दुस-या- तिस-या हप्त्याचा निधी अद्याप मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने 1.2 लाख रुपयांची नुकसान भरपाईची तरतूद केली असून नुकसान भरपाई तसेच घर देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेचे सहकार्य असेल तर वारंवार पाण्याखाली जाणारी गावे स्थलांतरित करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी उपाययोजनांची कामे सुरू झाली आहेत. म्हैसूर, हासन, कोडगु जिल्ह्यांचा दौरा करण्यात आला असून मृत जनावरे तसेच पशुधनासाठी तातडीने नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. पडलेल्या घरांची भरपाई, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आदी सर्व पावले उचलली जात आहेत. बेळगावात गेल्या ४२ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांनाही सुट्टी जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.