लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (१ ऑगस्ट) दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे यंदा ४२ वे वर्ष असून, एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणति टिळक लिखित ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश या कॉफी टेबल बुकमध्ये आहे.