Ad imageAd image

कडोलीचा तलाव दुसऱ्यांदा फुटला :भात पीक झाले नष्ट

ratnakar
कडोलीचा तलाव दुसऱ्यांदा फुटला :भात पीक झाले नष्ट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव :मुसळधार पावसामुळे कडोली येथील तुडुंब भरलेला वाघमारी तलाव 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा फुटल्याची घटना आज रविवारी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली. फुटलेल्या तलावाचे पाणी शेत जमिनीत घुसल्यामुळे लाखो रुपयांचे भात पीक नष्ट झाले असून कडोली-गुंजी रस्ता तलावाच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळी काही काळ ठप्प झाली होती.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या कहरामुळे कडोली ता. जि. बेळगाव येथील तुडुंब भरलेला वाघमारी तलाव आज रविवारी सकाळी अचानक फुटला. फुटलेल्या तलावाच्या पाण्याचा प्रचंड मोठा लोट शेजारील शेत जमिनीत शिरल्याने सुमारे 35 एकर मधील भात पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेताप्रमाणे लगतच्या दोन घरांमध्ये देखील तलावाचे पाणी घुसली होते. यापूर्वी 2019 मध्ये हा वाघमारी तलाव पहिल्यांदा फुटला होता.

तलावाच्या ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्यामुळे यंदा आज सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास हा तलाव दुसऱ्यांदा फुटला. याबाबतची माहिती मिळताच कडोली ग्रा.पं. अध्यक्ष सागर पाटील, ग्रा.प. सदस्य व गावातील प्रमुख नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन पाहणी केली. तसेच घटनेची माहिती तलाठ्यांना दिली.

तलाव फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. काही उत्साही तरुणांनी आपल्या मोबाईलवर फुटलेला तलाव, त्याचे धो धो वाहणारे पाणी, जलमय झालेली शेत जमीन यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

कडोलीचा तलाव फुटल्याची माहिती मिळताच तलाठी अरिफ मुल्ला, तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणीअंती तलाठी मुल्ला यांनी पाऊस थोडा कमी होऊन पाणी ओसरताच आपण नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करू असे आश्वासन दिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article