Ad imageAd image

राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू तर गेल्या पाच वर्षांत देशभरात किती जण दगावले ?

ratnakar
राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू तर गेल्या पाच वर्षांत देशभरात किती जण दगावले ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील पोलीस कोठडीत ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ कालावधीतील या आकडेवारीनुसार, सर्वाधिक म्हणजे ८१ मृत्यू गुजरातमध्ये झाले असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात या काळात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे.

मुंबईत अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनुज थापन (२३) याने १ मे २०२४ रोजी गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केली होती. त्यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गोवर्धन गणेश हरमकार (१९) याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. चोरीत सहभागी असल्याचा संशयावरून त्याला अटक करण्यात आली होती. याशिवाय मुंबईत हवाई सुंदरीची हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल (४०) याने ८ सप्टेंबर २०२३ रोजी अंधेरीत कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपक जाधव (२८) याने २८ जुलै २०२३ रोजी बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती. ४ ऑगस्ट २०२३ रोजी विशाल ढेंडे याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. हरियाणातील कुख्यात टोळीचा प्रमुख संदीप गडोली याला ७ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंबईत हरियाणा पोलिसांनी चकमकीच ठार केले होते. हरियाणा पोलिसांनी मुंबईत केलेल्या या चकमकीवर अनेक आरोप झाले होते. त्यामुळे ही चकमक गाजली होती.

आरोपांमुळे लगाम
मुंबईत टोळीयुद्ध सुरू झाल्यानंतर पोलिसांनी गुंडांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. पोलिसांबरोबर १९९९ मध्ये झालेल्या चकमकीत ८३ गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनी धसका घेतला होता. २००० मध्ये पोलीस चकमकीत ७३, तर २००१ मध्ये पोलीस चकमकीत ९४ गुंड मारले गेले होते. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर २००२ मध्ये ४७ गुंडांचा चकमकीत खात्मा झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांवर आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे मुंबईतील चकमक बंद झाल्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article