नवी दिल्ली : जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत असताना दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे.
टाटा समूह ४५ हजार नवे कर्मचारी भरतीची तयारी करत आहे तर महिंद्रा समूह देखील आता मागे राहिलेला नाही. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येत्या काळात आपल्या मनुष्यबळात २० हजार कर्मचाऱ्यांची वाढ करण्याचा प्लान करत आहे.
एका वर्षात होणार नवी भर्ती
टेक सेक्टरमध्ये अनेक बड्या कंपन्यांमध्ये मंदीच्या जोखमीचा परिणाम पाहायला मिळत आहे. बिजनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत महिंद्रा समूहातील टेक महिंद्रा कंपनीचे सीईओ सीपी गुरनानी यांनी येत्या वर्षभरात कंपनीत २० हजार नव्या लोकांना जोडणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या आमच्याकडे १ लाख ६४ हजार लोक काम करत आहेत. आता येत्या १२ महिन्यात हा आकडा १,८४,००० इतका होईल, असंही ते म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात दिला इतका रोजगार
टेक महिंद्रा कंपनीकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार कंपनीत सप्टेंबर महिन्यात ५,८७७ नव्या कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. हाच आकडा जूनच्या तिमाहीमध्ये ६,८६२ इतका होता. रिपोर्टनुसार, कंपनीत सध्या एकूण १,६३,९१२ कर्मचारी कार्यरत आहेत.
कंपनीत नोकरी सोडण्याचा दरही घटला
रिपोर्टानुसार जिथं इतर सेक्टरमध्ये अन्य कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा दर वाढत असातना टेक महिंद्रा कंपनीत मात्र वर्षागणिक हाच दर कमी होत आहे. कंपनीत नोकरी सोडण्याचा दर गेल्या तिमाहीमध्ये २२ टक्के इतका होता. त्यात घट होऊन आता तो २० टक्क्यांवर आला आहे. आम्ही भविष्य, स्किल डेव्हलपमेंट आणि ग्लोबल डिलिव्हरी मॉडलवर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि याच पद्धतीची रणनिती तयार केली जाणार आहे, असंही कंपनीच्या सीईओंनी सांगितलं.
आता येणारा आगामी काळ हा युवा पिढीला बेरोजगारीतून नक्कीच मुक्त करेल असा विश्वास टाटा अँड महिंद्रा समूहातर्फे धरायला हरकत नाही.