केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ या चित्रपटाचा बोलबोला अजूनही सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला तरी अजूनही सिनेमागृहात या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाचा जलवा कायम आहे.
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट करून या चित्रपटाने ३० दिवसांत किती कोटींची कमाई केली, हे जाहीर केलं आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने ३० दिवसांत ७०.२० कोटींची कमाई केली आहे. याचा फोटो केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या कमाई बरोबर एक जबरदस्त वाक्य त्यांनी लिहिलं आहे. “हॉलिवूड-बॉलिवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा ‘भारी’ आकडा” असं हे वाक्य आहे.
फोटो पोस्ट करताना केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की, “आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रुपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रुप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रुपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपटगृहात अवतरला आणि पदरात दान टाकून गेला… अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय.”