बेळगाव : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील ‘द पोलाइट्स ऑफ बेलगाम वर्ल्ड वाईड’ अर्थात सेंटपॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या शिबिराच्या माध्यमातून तब्बल 221 युनिट्स रक्त गोळा झाले.
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, आय.एम.ए. बेळगाव शाखा, एनएसएस केएलई विद्यापीठ, बी.एन.आय. बेळगाव हुबळी धारवाड, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी ई -क्लब ऑफ बेळगाव, बेळगाव रोट्रॅक्ट जिल्हा, पालक आणि सेंटपॉल हायस्कूलची शिक्षक संघटना यांच्या सहकार्याने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार, रोटरी जिल्हा 3170 चे प्रांतपाल रो. शरद पै, बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी व अन्य उपस्थित होते. सदर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात रक्तदानाचे महत्त्व विशद करून समाजाचे आरोग्यबद्दल मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलाइट्स ऑफ बेलगाम वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी सर्वांचे स्वागत केले तर शेवटी सचिव अनिकेत क्षत्रिय यांनी आभार मानले.
देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ आयोजित या शिबिराला समाजातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांसह सेंट पॉल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिरात उस्फुर्त रक्तदान केले. सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे सदर शिबिराच्या माध्यमातून 221 युनिट्स रक्त गोळा झाले.
जे केएलई रक्तपेढीच्या साठ्यात लक्षणीयरीत्या वाढ करेल आणि ज्याचा उपयोग गरजूंचा जीव वाचवण्यासाठी होणार आहे. सदर रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे द पोलाइट्स ऑफ बेलगाम वर्ल्ड वाइडने मनःपूर्वक आभार मानले आहेत.